पुरत पुस्तक वाचून झालं पण शेवटच्याच वाक्याला डोळ्यात अश्रू यावेत,किती लेखणीची प्रगल्भता हि ! मुन्शीनी होरील साकारतांनी अक्षरशः जीव ओतला आहे. समाजाच्या चौकटीत ‘आब्रू ठेवून जीवन जगण्याची ‘ छोटीशी अपेक्षा सुध्दा जेव्हा मरेपर्यंत पूर्ण होत नाही तेव्हा वाचकाला पाझर तर फुटणारच ! ‘भारत स्वतंत्र झाला तो केवळ शहरात’ हि सूचना कादंबरीत ठीक ठिकाणी पाहायला मिळते. मुन्शीनी संपूर्ण जीवनाचा पटल खूप सुगम्य रीतीने वाचकांपुढे मांडला आहे.
शेती करून उदर भरणारा होरी आणि त्याचा कुटुंब, त्यांचा व्यथा जिवंत करण्यात मुन्शी यशस्वी झालेत. होरी हा कादंबरीचा नायक वाटतो पण मुळात तो नायक नव्हताच, कारण नायक म्हणलं कि तो आयडियल पुरुष वा स्त्री असतो , पण होरी तर काही ठिकाणी साधा सरळ तर काही ठिकाणी चंट लोभी , चलाख सुध्दा वाचायला भेटला,हि खरी मुन्शीची जादू!! कादंबरीचा खरा नायक असते ती ‘परिस्थिती’! म्हणतात ना परिस्थिती माणसाकडून काहीही करवून घेऊ शकते , त्यातलच काहीस होरी सोबत घडतांना दिसते.
एका छोट्याशा गावात शेती करून , जमीनदारांचा कर्ज फेडत उधारीचे आयुष्य होरी जगत असतो. त्यात त्याला धनिया म्हणजे त्याची अर्धांगिनीची साथ ‘मरेपर्यंत’ लाभते. कादंबरीचा तत्कालीन सामाजिक परिस्थितीशी असलेला साम्यपणा जमेची बाजू आहे. एकीकडे श्रीमंत लोकांचा म्हणजेच रायसाहेब , मि. खन्ना , मि मेहता , मिस मालती यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तर दुसरीकडे गरिबीत जीवन कंठीत असलेल्या लोकांचा जीवनाचा दृष्टिकोन याचा लेखकाने सुरेख मेळ घातला आहे.
सामान्य माणसाच्या जीवनात समाज आणि धर्माचं किती महत्व आहे हे सुस्पष्ट रीतीने मांडले गेले आहे. होरी नेहमीच मोठ्या मनाने जीवन जगत गेला आहे. दुःखाचं सागर त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर तर संभाळालचं पण प्रेमाचं शिखर गाठून माणुसकी कशी टिकवता येते याचा ज्वलंत उदाहरण सादर केलं आहे.होरीकडे आयुष्यात कधी पैसा नव्हता,होती ती फक्त आब्रू ! तिला जपण्यासाठीची धडपड म्हणजे ‘गोदान’! आजच्या जगात पैसे म्हणजेच आब्रू पण, आब्रू ची पैशाव्यतिरिक्त असलेली विशाल प्रतिमा लेखकाने सुरेख रेखाटली आहे. खेडेगावात असलेली आब्रू ची किंमत गोदान मध्ये सुंदर रीतीने मांडण्यात मुन्शी जिंकलेत!
गाईसाठी झटणार होरीच मन,आणि शेवटीही स्वतःच्याच अंगणात गाय बघण्यासाठीच्या धडपडीत मरणारा होरी हेच कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. पैसा नसून पैसे पणाला लावून आब्रू टिकवण्याचा होरीचा प्रयत्न म्हणजे ‘गोदान’! गरिबांना लुटून स्वतःची पोट भरणारी तालुकदार,जमीनदार आणि पंडित यांचा अप्पलपोटी जीवनाचा उल्लेख वाख्यानजोगा आहे.
सामान्य माणसाच्या जीवनात बिरादरी,समाज,आब्रू आणि धर्माचा असलेला पगडा आणि त्यांचा विळख्यात असल्यामुळे आयुष्याची होणारी अधोगती मन हलवून टाकणारी आहे.
होरीने ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!’ ह्या वाक्यावरच स्वतःच जीवन ओवाळून टाकलं आहे. होरीचा ‘नेकी कर दारिया मे डाल’ स्वभाव मनावर एक वेगळीच छाप टाकून जातो. भोळा,साधा असला तरी कुटुंबासाठी जीवावर खेळून जाणारा होरी शेवटी मनात घर करून जातो.
मुन्शीनी बरेच व्यक्तिचित्र रेखाटले आहेत आणि त्यांचा सुरेख मेळ बसवला आहे . कधी प्रेमाचा खरा अर्थ सांगतांनाचे मालती-मेहता, तर कधी ‘त्याग-क्षमा अलंकाराचे आभूषण परिधान केलेली गोविंदी, तर कधी जीवनात कळत-नकळत ,वाट चुकत सावरत पुढे चालणारे गोबर ,सिलिया आणि मातादीन ! सगळे जीवनातले बरेच भावूक रहस्य आपल्याला सहज सांगतांना दिसतात . ‘आयुष्य म्हणजे नेमकं काय ?’ असा प्रश्न मनाला पडत असेल तर ‘गोदान’ एकदा वाचायला हरकत नाही!

Advertisements